Voice of Eastern

मुंबई : 

जन्मत: पायात व्यंग असलेल्या बाळांचे पाय सरळ करण्यासाठी ‘स्मार्ट क्लबफूट ब्रेस’ तर हातपंपातून शुद्ध पाणी येण्यासाठी पंपात बसविण्यात येणारे विशिष्ट उपकरण आणि उष्ण वातावरणात थंडावा देणारे आणि थंडीमध्ये उब देणारे आगळेवेगळे जॅकेट अशा एक ना अनेक अनोख्या संकल्पनांचा उदय आयआयटी मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’ या कार्यक्रमात झाला.

आयआयटीमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील सर्व आयआयटींमध्ये मिळून ‘द इन्व्हेन्शन फॅक्ट्री’ नावाची स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा ही स्पर्धा आयआयटी मुंबईमध्ये आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये देशातील आयआयटीमधील २० विद्यार्थ्यांच्या १० टीम्स सहभागी झाल्या होत्या. या प्रत्येक टीमने एक प्रोटोटाइप बनवला आहे. या प्रोटोटाइपच्या स्वामित्व हक्कासाठी अमेरिका आणि भारत दोन्हीकडे अर्ज करण्यात आला आहे. यामध्ये आयआयटी खरगपूर येथील सुप्रिया कोंडा आणि शान सापरू या विद्यार्थ्यांनी जन्मत: पायात व्यंग असलेल्या बालकांना योग्य वयात जर त्यांच्या पायाला सरळ करण्यासाठी आवश्यक असा कृत्रिम पाय तयार केला आहे. हा कृत्रिम पाय बालकांच्या पायाला जोडल्यास बालकांच्या पायातील व्यंग दूर होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या ‘स्मार्ट क्लबफूट ब्रेस’ प्रकल्पाला दोन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे. तर आयआयटी मुंबईतील अप्रित उपाध्याय आणि मोहित जजोरिया यांनी हातपंपातून बाहेर येणारे पाणी स्वच्छ कसे मिळेल यासाठी एक उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण हातपंपाला लावल्यास त्यातून स्वच्छ पाणी मिळू शकणार आहे. त्यांच्या या प्रकल्पाला एक लाख रुपयांचे दुसरे पारितोषिक देण्यात आले आहे. तर आयआयटी रोपर येथील राहुल बन्सल आणि मद्रासचा फालगन व्यास यांनी वीजेवर चालणारा आणि वापरकर्त्यांना उपयुक्त असा अंगरखा तयार केला आहे. जो अंगरखा वातावरणानुसार आपल्याला अनुभव देणार आहे. म्हणजे उष्णतेच्या वातावरणात थंड अनुभव तर थंडीत उब देणार आहे. या प्रकल्पाला ५० हजार रुपयांचे तिसरे पारितोषिक देण्यात येणार आहे.

पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे देशातील विविध आयआयटीमधील विद्यार्थ्यांना एकत्र येऊन संशोधन आणि विकास करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी समाजातील समस्यांवर अल्पदरात तोडगा उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते.
– डॉ. सुभाशिष चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई

Related posts

मुंबई विद्यापीठाच्या ‘उमला’वर बीसीआयच्या मान्यतेची टांगती तलवार

प्रजासत्ताक दिनी कागदी व प्लास्टीक ध्वजांचा वापर टाळा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षांत समारंभ स्थगित

Leave a Comment