मुंबई :
संगीत क्षेत्रात करियर करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार होते. या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना संगीतातील बारकावे व त्याचे सखोल ज्ञान प्रत्यक्ष मंगेशकर कुटुंबियांकडून मिळणार होते. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेला प्रस्ताव त्यांनी नाकारला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी युवासेनेने पुढाकार घेत राज्यपालांना प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केली आहे.
विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रातील सखोल व उत्तम ज्ञान मिळावे यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार होते. या महाविद्यालयामुळे संगीतात करियर करणार्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणार होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. राज्य सरकार हे महाविद्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक असले तरी महाविद्यालयाचा प्रस्ताव राज्यपालांकडून फेटाळण्यात आला. राज्यपालांनी प्रस्ताव फेटाळणे म्हणजे भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा उचित गौरव करण्याची संधी गमावणे तसेच अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. महाविद्यालयाचा प्रस्ताव नाकारणे ही बाब खेदजनक असून, त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये संगीत महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता शासनाच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा आणि मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालयास कलिना कॅम्पसमध्ये जागा देऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन युवासेना सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शशीकांत झोरे, डॉ.धनराज कोहचडे, सौ.शितल देवरुखकर शेठ, अॅड. वैभव थोरात आणि मिलिंद साटम यांनी राज्यपालांना दिले.