मुंबई :
बृहन्मुंबई महापालिका रुग्णालयाच्या संचालकपदी असलेल्या डॉ. रमेश भारमल यांची २८ फेब्रुवारीला सेवा संपुष्टात आल्याने ते निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी सेवाज्येष्ठतेच्या निकषानुसार नायर दंतवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षक डॉ. नीलम अद्रांडे यांची वर्णी लागली आहे. तर नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. कल्पना मेहता यांची वर्णी लागली आहे.
मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे संचालक व नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता अशा दुहेरी जबाबदारी डॉ. रमेश भारमल सांभाळत होते. मात्र त्यांची सेवा २८ फेब्रुवारीला संपत असल्याने त्यांच्याकडील संचालक पदाचा पदभार हा नायर दंत महाविद्यालयाच्या अधीक्षक डॉ. नीलम अंद्राडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता म्हणून डॉ. कल्पना मेहता यांची नियुक्ती केली आहे. डॉ. अंद्राडे यांनी कोरोना काळात पश्चिम उपनगरामध्ये कोरोना केंद्रांची उभारणी आणि त्यांचे वैद्यकीय व्यवस्थापन उत्तम पद्धतीने सांभाळले होते. नायर दंतविद्यालयात त्यांनी २०१७ मध्ये अधिष्ठातापदाची जबाबदारी स्वीकारली. पालिका रुग्णालयाच्या संचालकपदासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांपेक्षा त्यांना २० महिन्यांचा अनुभव अधिक आहे.