मुंबई :
मनोरंजनाच्या माध्यमातूनही काही ना काही संदेश देणारं आशयघन कथानक ही नेहमीच मराठी सिनेमांची खासियत राहिली आहे. याच वैशिष्ट्याच्या बळावर जगभर कौतुकास पात्र ठरणाऱ्या मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत रसिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. सद्य सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या ‘आश्रय’ या आगामी मराठी सिनेमातही एक आशयसंपन्न कथानक पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, पाहताक्षणीच खिळवून ठेवणाऱ्या ‘आश्रय’च्या ट्रेलरला रसिकांची पसंती मिळत आहे.
संकल्प मोशन फिल्म्स प्रस्तुत ‘आश्रय’ची निर्मिती अभिषेक फडे यांनी केली आहे. ‘आश्रय’चं दिग्दर्शन रमेश ननावरे आणि संतोष कापसे यांनी केलं आहे. ‘आश्रय’चा ट्रेलर खऱ्या अर्थानं चित्रपटाच्या कथानकाचं प्रतिनिधीत्व करणारा असल्याचं पाहिल्यावर लक्षात येतं. चित्रपटाचा मूळ विषयाचं गुपित कुठेही न उलगडता बनवण्यात आलेल्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत आहे. या ट्रेलरमध्ये आई नावाच्या दैवी शक्तीबाबत सांगण्यात आलं आहे. प्रत्येकाच्या स्वप्नांची सांगड वास्तवाशी घालण्यात आल्याचं पहायला मिळतं. या जोडीला स्वप्नांच्या मागं धावत ती साकार करण्यासाठी आणि स्वत:ची ओळख तयार करण्यासाठी धडपडणाऱ्या नायक-नायिकेची रोमँटिक कथाही आहे. यात होळीच्या सणाचं गाणंही आहे. ‘आश्रय’ हा केवळ एक चित्रपट नसून, हा एक विचार असल्याचं मत दिग्दर्शक रमेश ननावरे आणि संतोष कापसे यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, या चित्रपटाचं कथानक समाजात कुठेही घडणारं आहे. या कथानकाला कोणत्याही जागेचं बंधन ताही. हा एक विचार आहे, जो समाजात रुजण्याची गरज आहे. ‘आश्रय’ चित्रपटाद्वारे आम्ही तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचा विषय आणि त्यातील घटना प्रत्येकाशी रिलेट होणाऱ्या आहेत. असं असलं तरी रसिकांचं मनोरंजनाचा परीपूर्ण विचार या चित्रपटात करण्यात आला आहे. यासाठी संपूर्ण टिमनं खूप मेहनत घेतली असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक दर्जेदार सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
श्वेता पगार आणि अमेय बर्वे हि नवी जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय निशिगंधा वाड, सुनील गोडबोले, दीपाली कुलकर्णी आदी कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.