मुंबई :
राज्य लोकसेवा आयोगातर्फे २०२०मध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका अद्याप जाहीर न झाल्याने चार हजारहून अधिक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पहिली उत्तरतालिका जाहीर होऊन ६० दिवस होऊन गेले तरी अंतिम उत्तरतालिका जाहीर न झाल्याने उमेदवारांचा संयमाची परीक्षा पाहिली जात आहे.
राज्य लोकसेवा आयोगातर्फे २०२०मध्ये सहाय्यक मोटार निरीक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले होती. ही परीक्षा झाल्यानंतर विविध न्यायायलीन प्रकरणे आणि करोनामुळे परीक्षेचा निकाल रखडला आणि तो अखेर १४ ऑक्टोबर २०२१रोजी जाहीर करण्यात आला. यानंतर २० नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा पार पडली. २९ नोव्हेंबर रोजी पहिली उत्तरतालिका आयोगाने प्रसिद्ध केली. यानंतर उमेदवारांनी आपल्या सूचना कवळल्यानंतर अंतिम उत्तरतालिका ४५ दिवसांत जाहीर होणे आवश्यक होते मात्र अद्याप ती जाहीर झालेली नाही. यामुळे या उमेदवारांची पुढील प्रक्रिया पार पडत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. दोन वर्षांपासून आम्ही उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहोत. आता आयोगाने संयमाची आणखी परीक्षा न पाहता पुढील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा उमेदवार व्यक्त करत आहेत.