Voice of Eastern

मुंबई : 

चारित्र्याच्या संशयावरुन एका ७० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच पतीने चाकूने भोसकून हत्या करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. मृत महिलेचे नाव मुमजात समसुद्धीन शेख असून तिच्या हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७५ वर्षांचा पती समसुद्धीन चाँदसा शेख याच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

रफिक शेख हे मालाड येथील मालवणी परिसरात राहत असून ते इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतात. त्याची आई मुमताज ही जवळच असलेल्या शाळेत साफसफाईचे काम करते तर त्याचे वडिल समसुद्धीन हे बिगारी कामगार म्हणून कामाला होते. गेल्या तीन महिन्यांपासून समसुद्धीन हा त्याची पत्नी मुमताजच्या चारित्र्यावर संशय घेत होते. ती बाजारात सामान आणण्यासाठी बाहेर जात असताना समसुद्धीन हा तिच्या मागे तिचा पाठलाग करीत होता. ती कोणाला तरी भेटण्यासाठी जाते असे समजून तो तिच्याशी सतत वाद घालून भांडण करीत होता. यावेळी रफिकने अनेकदा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तुमच्या दोघांचे वय झाले असून अशा प्रकारे आईवर संशय घेणे चुकीचे असल्याचे सांगून तो त्याचे वडिल समसुद्धीन यांची समजूत काढत होता. मात्र त्याच्या स्वभावात काही बदल झाला नव्हता. तो मुमताजला शिवीगाळ करुन सतत मारहाण करीत होता. शुक्रवारी रफिक हा कामानिमित्त बाहेर गेला होता. यावेळी घरात कोणीही नसताना समसुद्धीनने मुमताजशी याच कारणावरुन भांडण केले होते. या भांडणानंतर त्याने मुमताजची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्याच चाकूने स्वतवर हल्ला करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दोघांनाही पोलिसांनी भगवती रुग्णालयात दाखल केले. तिथे मुमताजला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर समसुद्धीनला उपचारासाठी दाखल केले होते. याप्रकरणी रफिकने दिलेल्या तक्रारीवरुन त्याच्या वडिलांविरुद्ध पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related posts

संयुक्त जयंतीनिमित्त गुरु नानक महाविद्यालयात १३१ तास अभ्यास उपक्रम

दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयावर जे जे रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Voice of Eastern

खो-खोच्या स्पर्धेचे लायन्स गवर्नर प्रसाद पानवलकर यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Comment