Voice of Eastern

वेलिंग्टन :

लो स्कोअर सामन्यांत पाच विकेट आणि ६५ चेंडू राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील दबदबा कायम राखला. कांगारूं संघांचा आयसीसी महिला वर्ल्डकप संघांतील हा सलग सातवा विजय आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत साखळीत अजिंक्य राहिलेला तो एकमेव संघ आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पर्ध्यांचे १३६ धावांचे विजयी लक्ष्य ३२.१ षटकांत ५ विकेटच्या बदल्यात पार केले. त्यात बेथ मुनीचे (नाबाद ६६ धावा) सर्वाधिक योगदान राहिले. चौथ्या क्रमांकावरील या बॅटरने ७५ चेंडूंत ६६ धावांची नाबाद खेळी केली. त्यात ५ चौकारांचा समावेश आहे. बांगलादेशचे आव्हान जवळपास ११ षटके राखून पार केले तरी ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली. फलकावर २२ धावा असताना सलामीवीर अलिसा हिली बाद झाली. तिने २२ चेंडूंत १५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या कर्णधार मेग लॅनिंगला आठ चेंडू खेळूनही खाते उघडता आले नाही. मधल्या फळीतील तहिला मॅकग्रा (३ धावा) आणि अॅश्ली गार्डनर (१३ धावा) लवकर माघारी परतल्या तरी मुनी हिने अॅनाबेल सदरलँडच्या साथीने (नाबाद २६ धावा) विजय साकारला.

तत्पूर्वी, पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे प्रत्येकी ४३ षटकांचा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रतिस्पर्ध्यांना फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रभावी गोलंदाजांच्या जोरावर बांगलादेशला ४३ षटकांत ६ बाद १३५ धावा करता आल्या. लता मोंडलने ६३ चेंडूत ३३ धावा करताना संघाला शंभरीपार नेण्यात मोलाचा वाटा उचलला. तिच्यानंतर सलामीवीर शर्मिन अख्तरने (२४ धावा) सर्वाधिक धावा केल्या. कांगारूंकडून अॅश्ली गार्डनर आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी २ विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील ७ पैकी सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. कमालीचे सातत्य राखताना सर्वाधिक १४ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. सद्य:स्थितीत टॉपर ऑस्ट्रेलियन संघ यंदाच्या विश्वचषक विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहे. ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिकेने (६ सामन्यांत ९ गुण) उपांत्य फेरी निश्चित केली आहे. उर्वरित दोन स्थानांसाठी वेस्ट इंडिज (७ सामन्यांत ७ गुण), इंग्लंड (६ सामन्यांत ६ गुण) आणि भारत (६ सामन्यांत ७ गुण) या तीन संघांमध्ये चुरस आहे.

Related posts

दिवा-रोहा पॅसेंजरमध्ये विसरलेले १३ तोळे सोने प्रवाशाला मिळालेले परत

दासगावमध्ये रंगला होडी स्पर्धेचा थरार

भाजपचे लोक जाणूनबुजून महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत – जयंत पाटील

Leave a Comment