मुंबई :
महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच झोपडपट्टी भागामध्ये आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांमुळे नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होते. मात्र याच डॉक्टरांना अनेकदा बोगस किंवा भोंदू म्हणून हिनवले जाते. मात्र आता अशाप्रकारे आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना बोगस किंवा भोंदू संबोधणे महागात पडणार आहे. जाहीर नोटीस, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया, संकेतस्थळ, एफआयआर, प्रेस रिलिज किंवा सरकारी दस्ताऐवजांमध्ये आयुर्वेद डॉक्टरांना बोगस किंवा भोंदू असा उल्लेख केल्यास तो वैद्यकीय कायद्याचा भंग ठरणार आहे. आयुष मंत्रालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी असे चार प्रकारच्या पदव्या आहेत. अॅलोपॅथीचा अभ्यासक्रम करणार्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस, आयुर्वेदचा अभ्यास करणार्यांना बीएएमएस, होमिओपॅथीचा अभ्यास करणार्यांना बीएचएमएस आणि युनानीचा अभ्यासक्रम करणार्या विद्यार्थ्यांना बीयूएमएस ही पदवी दिली जाते. मात्र यामध्ये एमबीबीएस पदवीधारक डॉक्टरांना सरकारी रुग्णालये तसेच शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र ग्रामीण महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये वैद्यकीय सेवा पुरवण्यामध्ये बीएएमएस, बीयूएमएस व बीएचएमएस हे डॉक्टर आघाडीवर आहेत. या डॉक्टरांमुळेच ग्रामीण व शहरातील झोपडपट्टी भागामधील नागरिकांना आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. बीएएमएस पदवीधारक असलेल्या आयुर्वेद तर बीयूएमएस पदवीधारक युनानी डॉक्टरांना अनेकदा जाहीर नोटीस, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया अशा विविध माध्यमांमधून किंवा एफआयआरमध्ये पोलिसांकडून बोगस किंवा भोंदू डॉक्टर म्हणून संबोधले जाते. त्याचा मोठा फटका डॉक्टरांना बसतो. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील वैद्यकीय विकास मंच, बीएएमएस ग्रज्युएट असोसिएशन, आयएमपीए, आयुर्वेद व्यासपीठ, अस्तित्त्व परिषद, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलन या संघटनांकडून आयुष मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला होता. यामध्ये मान्यताप्राप्त आयुर्वेद डॉक्टरांना अनेकदा प्रसारमाध्यमे व सरकारी दस्ताऐवजांमध्ये बोगस किंवा भोंदू म्हणून हिनवण्यात येते. त्यामुळे याला प्रतिबंध घालण्यात यावे अशी मागणी या संघटनांकडून करण्यात आली होती. या संघटनांच्या पत्राची दखल घेत आयुष मंत्रालयाने यापुढे आयुर्वेद डॉक्टरांना प्रसार माध्यमे, पोलिसांची एफआयआर किंवा कोणत्याही सरकरी दस्ताऐवजामध्ये बोगस किंवा भोंदू म्हणून संबोधल्यास तो नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक कायद्यातील तरतूदींचा भंग करणारा तसेच तसेच भारतीय औषध प्रणालीच्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन असेल, असे आयुष मंत्रालयाने १७ फेब्रुवारीला परिपत्रकाद्वारे वैद्यकीय विकास मंचचे समन्वयक डॉ. आशुतोष गुप्ता आणि बीएएमएस ग्रज्युएट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मांगरिश रांगणेकर यांना आयुष मंत्रालयाने पत्राद्वारे कळवले आहे.
आयुष मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकामुळे आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना खर्या अर्थाने न्याय मिळालेला आहे. त्यांची विनाकारण होणारी बदनामी यापुढे थांबली जाईल. या निर्णयाबाबत आयुष मंत्रालयाचे आम्ही मन:पूर्वक आभार मानत आहे.
– डॉ. मांगरिश रांगणेकर, अध्यक्ष, बीएएमएस ग्रज्युएट असोसिएशन
भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या स्पष्टीकरणाामुळे देशातील नोंदणीकृत आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना काहीजण जाणीवपूर्वक बोगस किंवा भोंदू ठरवून अपप्रचार करत आहेत. त्यांना या निर्णयाने रोखठोक उत्तर मिळाले आहे. नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जयंतराव देवपुजारी आणि बोर्ड ऑफ इथिक्स अॅण्ड रजिस्ट्रेशनचे अध्यक्ष डॉ. राकेश शर्मा यांच्या निर्णयामुळे आयुर्वेद व युनानी डॉक्टरांचे मनोबल उंचावण्यास मदत होणार आहे.
– डॉ. आशुतोष गुप्ता, समन्वयक, वैद्यकीय विकास मंच