मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करत आता भायखळा येथील पर्यटकांचे आकर्षण असलेली राणी बाग गुरुवारपासून पुन्हा खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे बच्चे कंपनीला आता पुन्हा पेंग्विन, हरिण, वाघ पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणी बाग ही कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारीपासून बंद करण्यात आली होती. मात्र राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता गुरुवारपासून राणी बाग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राणी बागेत दररोज ६ ते ७ हजार पर्यटक भेटी देत असतात. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी हीच संख्या १६ हजारांपर्यंत पोहोचते. त्यामुळे कोरोनाचे अद्यापही कायम असलेले संकट लक्षात घेता पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी तिकिट खिडकीच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. सध्या तीन तिकिट खिडक्या असून, त्यामध्ये एका खिडकीची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे खिडक्यांची संख्या चार इतकी होणार आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार असून, ३९ खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहे. तसेच राणी बागेत येणार्या प्रत्येक पर्यटकासाठी मास्क व सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात येणार आहे. राणीची बाग सकाळी ९.३० ते ६ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुली असणार आहे. यादरम्यान पर्यटकांची संख्येत क्षमतेपेक्षा जास्त वाढ झाली तर मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
हे प्राणी-पक्षी पाहायला मिळतील
वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात सध्याच्या घडीला दोन वाघ, नऊ पेंग्विन, शेकडो प्रकारचे पक्षी, हरणे, हत्ती, तरस, माकडे, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी तसेच २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष व विविध वनस्पती आहेत. रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.