मुंबई :
भेसळयक्त खाद्यतेलाच्या तक्रारींचे वाढते प्रमाण लक्षात घेत अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहम संरक्षण विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने एमएमआर भागामध्ये भिवंडी, मिरा रोड, वाशी याचबरोबरच पनवेल, अलिबागमध्ये छापे घातले आहेत. या छाप्यातून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त सूर्यफूल आणि शेंगतेलचे साठे सापडले असून, भेसळ करणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
फूड अँड ड्रग्ज कन्झ्युमर वेलफेअर कमिटी या स्वयंसेवी संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंबईसह आसपासच्या भागामध्ये अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग व एफडीएकडून छापे घालण्यात येत आहेत. यामध्ये भिवंडीतील श्री गॅलक्सी एन्टरप्राईझ आणि मिरा रोडमधील आशीर्वाद ऑईल डेपोवर छापा घालण्यात आला. या छाप्यामध्ये श्री गॅलक्सी एन्टरप्राईझेस गोल्डन डिलाईट रिफाईंड सूर्यफूल तेल, गॅलक्सीज फ्रेशलाईट रिफाईंड सूर्यफूल तेल, सुपर सनलाईट रिफाईंड सूर्यफूल तेल, दिव्य रिफाईंड सूर्यफूल तेल, सुपर सन रिफाईंड सूर्यफूल तेल, सौराष्ट्र शेंगदाणा तेल, श्री राजवाडी शेंगदाणा तेल, गॅलक्सीज गजानन आणि रुद्राक्ष शेंगदाणा तेल या नावाने भेसळयुक्त तेलाचे उत्पादन आणि विक्री होताना दिसून आले. त्याचप्रमाणे मिरा रोड येथील आशीर्वाद ऑईल डेपोमध्ये रिफाईंड सूर्यफूल तेल, सुपर सन गोल्ड रिफाईंड सूर्यफूल तेल आणि सन सिल्व्हर रिफाईंड सूर्यफूल तेल या नावाने तेलाचे उत्पादन आणि विक्री करत असल्याचे उघड झाले. एफडीएने या तेलाच्या पाकिटांचे नमुने जप्त करत पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने वाशी येथील गौतम ऍग्रो इंडिया या कंपनीवर छापा घातल. छाप्यात गौतम अॅग्रो, गौतम तरल, सनटॉप, सनटाईम, गोल्डन डिलाईट, दिव्या आणि गॅलक्सीज फ्रेशलाईट या नावाने तेलाची विक्री होत असल्याचे आढळून आले. या कारखान्यामध्ये शुद्ध रिफाईंड सूर्यफूल तेलांमध्ये पाम तेलाची भेसळ करण्यात आल्याचे दिसून आले. या तेलाच्या पाकिटांचे नमुने जप्त केले. भेसळीचे प्रमाण आणि घातक पदार्थांचे प्रमाण मोजण्यासाठी आणि पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अधिकारी कमलेश डी. केदारे यांनी सांगितले.