मुंबई :
चीन तसेच दक्षिण कोरियासह युरोपात कोरोनाची चौथी लाट सुरु झाली आहे. यावेळी रुग्णसंख्या दुप्पटीने आढळून येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा संसर्ग आणि प्रभावाचा अभ्यास सुरु झाला आहे. त्यामुळे लसवंत व्हा, तसेच सावधानता बाळगा असे राज्य कोरोना टास्क फोर्स सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
कोरोनाच्या विषाणूवर लस एकमेव पर्याय असल्याने चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाला महत्व देण्यात यावे, तसेच मास्क, सोशल डिस्टसिंग आणि हात धुणे अशासारखे कोरोना नियमांचे पालन कायम ठेवण्यात यावे, असेही डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले. दरम्यान केंद्रांकडून राज्यांना चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सूचना दिल्या आहेत. यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रांने दिलेल्या कोविड सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले ओहत. त्याप्रमाणे चाचणी, शोध, उपचार, लसीकरण, आणि कोरोना वर्तणूक याचा अवलंब करण्याच्या सुचना असल्याचे टोपे म्हणाले. चीन तसेच दक्षिण कोरिया युरोपमध्ये कोरोनाची चौथी लाट आल्याने काही देशांत खाटा उपलब्ध होत नसून रस्त्यांवर रुग्णांना ठेवले जात आहे. मागच्या अनुभवातून यावेळी देखील प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी. केंद्र सरकार जागतिक कोरोना स्थितीवर नजर ठेवून असल्याने राज्य सरकारला दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येणार असल्याचेही टोपे म्हणाले.