भांडुप :
भांडुपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) वैद्यकीय सेवा देण्याची जबाबदारी मे. इंडियन पेडियाट्रिक नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या खासगी संस्थेवर सोपविण्यात आली आहे. महापालिकेने ३ वर्षांसाठी या संस्थेशी ८ कोटी २१ लाख २५ हजारांचा करार केला आहे. तरीही ४ नवजात दुर्दैवी बालकांचा मृत्यू होणे ही बाब अतिशय धक्कादायक आहे. वैद्यकीय सेवेच्या नावाखाली प्रतिदिन २० बेडसाठी ७५ हजार रुपये एवढी अवाढव्य रक्कम महापालिका खासगी संस्थेच्या घशात घालत असून सेवा देण्याऐवजी सव्वा आठ कोटींचा मेवा नेमका कुणासाठी आहे? असा सवाल करत याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
मुंबई महापालिकेने मे. इंडियन पेडियाट्रिक नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला तब्बल १० वर्षांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचे कंत्राट दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव १२ मे २०२१ च्या स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. या नवजात अतिदक्षता विभागाचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांनी ८ ऑगस्ट २०२१ रोजी स्थानिक शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांच्या उपस्थितीत केले होते. त्यानंतर अवघ्या ४ महिन्यांत ही दुर्दैवी घटना घडली आहे. मोठा गाजावाजा करत उद्घाटनाची फीत कापणार्या महापौर आता तरी आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देतील काय, असा प्रश्न प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
सद्य:स्थितीत मुलुंड येथे अग्रवाल रुग्णालय पुनर्निर्माणाधीन असल्याने मुलुंड ते घाटकोपर परिसरात हा एकमेव नवजात अतिदक्षता विभाग आहे. त्यामुळे तेथील दुरवस्था म्हणजे नवजात अर्भकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याची टीका गटनेते शिंदे यांनी केली.