मुंबई :
सुप्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी रविवारी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याने ८ जानेवारीपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पोस्ट कोरोनाच्या त्रासामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्र सरकारने लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच त्यांच्याप्रती आदर म्हणून दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. लता दीदी यांच्यावर शासकीय इतमामात दादरच्या शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारतीय चित्रपट सृष्टीतील युगप्रवर्तक आणि सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका असा लौकिक असलेल्या लता मंगेशकर यांना वडील दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून कलेचा वारसा लाभला होता. बालवयातच त्यांनी संगीत नाटकात भूमिका साकारल्या होत्या. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याप्रमाणेच देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ आणि ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील गुरू होते. लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते. ‘पहिली मंगळागौर’ चित्रपटामध्ये त्यांनी अभिनयही केला होता. १९४६ मध्ये त्यांनी वसंत जोगळेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘आप की सेवा में’ या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी गाणे गायले. लता दीदी यांनी विविध २२ भाषांमधील १८०० हून अधिक चित्रपटांमध्ये २५ ते ३० हजार गाणी गायली आहेत. ‘जगात सर्वांधिक गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ या नावाने गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे.
सरकारने १९८७ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले, तर देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कारने २००१ मध्ये गौरवण्यात आले. लता दीदींना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. फ्रान्सचा ‘लिजन ऑफ ऑनर’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. सर्वोत्कृष्ठ गायिका म्हणून लता दीदींना चार फिल्मफेर, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने गौरवले आहे. १९८४ मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या सन्मानार्थ पुरस्कार जाहीर केला, तर महाराष्ट्र सरकारने १९९२ मध्ये संगीत क्षेत्रातील प्रतिभावानांना लता मंगेशकर पुरस्काराने जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
लता मंगेशकर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लताजींचे निधन जगभरातील लाखो नागरिकांप्रमाणेच माझ्यासाठी हृदयद्रावक आहे. त्यांच्या गीतातून भारताचे सार आणि सौंदर्य दिसून येते. पुढील अनेक पिढ्यांना आपल्या भावनांचे प्रतिबिंब त्यात आढळते. भारतरत्न लताजींची कामगिरी अतुलनीय राहिल, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. तर उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी लतादीदी खर्या संगीत रत्न होत्या असे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले दु:ख व्यक्त करताना लता दीदींकडून आपल्याला नेहमीच अपार स्नेह मिळाला. हा मी माझा सन्मान समजतो. त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहिल, अशा शब्दात शोक व्यक्त केला.
महाराष्ट्र व पश्चिम बंगालकडून एक दिवसाची सुट्टी जाहीर
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने ७ फेब्रुवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परक्राम्य संलेख अधिनियम १८८१च्या कलम २५ खाली महाराष्ट्र सरकारला सोपवलेल्या अधिकाराचा वापर करून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सोमवारी एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.