मुंबई :
भारताच्या प्रजासत्ताक दिनी चित्ररथातून प्रत्येक राज्याचे वैशिष्टे सार्या देशासमोर दाखवण्यात येत येतात. यंदा राज्यातील ‘जैवविविधतेची मानके’ सार्या देशालाच नव्हे तर जगाला चित्ररथातून दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्रातील अनोखे सौंदर्य पाहायला मिळणार आहे.
भारतामधील जैवविविधता अनेकांना भुरळ घालते. महाराष्ट्रात ही जैवविविधता चार मुख्य भागांमध्ये दिसून येते. महाराष्ट्रामध्ये युनेस्कोची मान्यता असलेले ‘कास पठार’, प्राणी, पक्षी व अन्य जीवांसाठी राखवी ठेवलेले अभयारण्य, दुर्मिळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. त्यानुसार यंदाच्या चित्ररथामध्ये ही जैवविविधता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चित्ररथावर दर्शनी बाजूस राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा असलेल्या ‘ब्ल्यू मॉरमॉन’ची ८ फूट उंच देखणी प्रतिकृती आहे. राज्य फुलपाखरू प्रमाणे राज्यफुल ‘ताम्हण’ची दीड फूटी प्रतिकृतीसह अनेक फुलांचे गुच्छ आणि त्यावर छोट्या फुलपाखरांच्या प्रतिकृती असणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यप्राणी ‘शेकरू’चे १५ फुटाची भव्य प्रतिमा उभारण्यात येणार आहे. तसेच युनेस्कोची मान्यता असलेले ‘कास पठार’ आणि तेथे आढळणारा ‘सुपारबा’ हा ३ फुटांचा सरडा असणार आहे. त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा असणार आहे. चित्ररथाच्या अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरू, राज्यवृक्ष आंब्याची १४ ते १५ फूट उंच प्रमिमा असणार आहे. महाराष्ट्रात नव्याने सापडलेल्या खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, दुर्मिळ माळढोक पक्षी, वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. या सर्वांची उत्तमरित्या आणि कलात्मक दृष्टिकोनातून रचना करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ही संकल्पना तयार केली असून, ती पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक कलाकार दिवसरात्र काम करत आहेत. राजपथावर हा वैविध्यपूर्ण जैवविविधतेचा वारसा कवितेच्या व मधुर संगीताच्या रूपात सादर केला जाणार आहे.