- मुंबई
लॉकडाऊन, आर्थिक मंदीमुळे महापालिकेने मुख्य रस्ते, उद्याने आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या विकासकामांना कात्री लावली. मात्र आता काही ठराविक भागातील पदपथांची सुधारणा आणि सुशोभीकरणासाठी कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येत आहे. यापूर्वी सीएसआर फंडातून होणारी कामे पालिकेच्या तिजोरीतून करण्यात येणार आहेत. पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीवर पदपथांचा भुर्दंड टाकला जात असल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
पी/दक्षिण विभागातील एम.जी.रस्त्यालगतचे पट्टे, पदपथ आणि एच/पूर्व विभागातील आर.के.पी. व संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यालगतचे पट्टे आणि पदपथांची मास्टीक अस्फाल्ट व सिमेंट काँक्रीटमध्ये अनुक्रमे सुधारणा व सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत आला. त्याचबरोबर चेंबूर, वडाळा येथील पदपथांची सुधारणा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सुधारणा व सुशोभीकरण करण्यात येणारे रस्ते हे मुख्य व हमरस्ते नसूनही त्यासाठी प्रत्यक्षात मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी लक्ष का घालावे. मुंबईत यापूर्वी बहुतांश पदपथांची कामे सीएसआर फंडातून करण्यात आली असताना या पदपथांच्या कामासाठी पालिकेच्या तिजोरीतून उधळपट्टी का करण्यात येत आहेत, असा प्रश्न शिंदे यांनी स्थायी समितीत उपस्थित करत सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले. पदपथ आणि रस्त्यालगतच्या पट्ट्यांचे काम करताना त्याखालून जाणारी उपयोगिता सेवेसाठी परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर डक्टिंग करण्याबाबत कोणताही विचार प्रस्तावात नाही. त्यामुळे वर्षभरात रस्त्यावर उपयोगिता सेवांसाठी चर खणल्यावर ते खराब होऊन पालिकेचे आर्थिक नुकसान होते. गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असून, मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडलेले असताना पदपथ सुशोभिकरणाचे प्रस्ताव महापालिकेच्या तिजोरीवर मोठा खड्डा पाडल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
पदपथासाठी सल्लागाराला ५० लाखांचे शुल्क
मुंबईत पदपथ आणि रस्त्यालगतच्या पट्ट्यांची कामे सल्लागाराविना अभियंत्यांनी समाधानकारकरित्या पूर्ण केली आहेत. मात्र या कामासाठी ५० लाख रुपये देऊन सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. सल्लागार म्हणून नेमलेले वास्तुविशारद ‘हेरिटेज एम्पेनल्ड सल्लागार’ आहेत. पदपथाच्या कामासाठी ‘हेरिटेज एम्पेनल्ड सल्लागार’ कशासाठी? पदपथ ही वास्तू हेरिटेज आहे का? असा प्रश्नही गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला.