मुंबई :
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. राज्यात ओमायक्रॉनचे सापडलेले रुग्ण आणि शाळा सुरू होण्याची जवळ आलेली तारीख, यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र मुंबई महापालिकेने १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याची सर्व तयारी केली आहे. ज्या शाळा मुख्याध्यापकांकडून कोविडच्या पालनात कुचराई होत आहे, त्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरू करण्यासंदर्भातील राज्य सरकारकडून सोमवारी निर्णय झाल्यानंतरच पालिका शाळांबाबत निर्णय होणार असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडू लागल्यानंतर या विषाणूचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे सांगत शालेय शिक्षण विभागाने १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता ओमायक्रॉनचे राज्यामध्ये १७ रुग्ण सापडले असून, त्यातील ७ रुग्ण बरेही झाले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनचा राज्यात प्रवेश झाला असला तरी त्याचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचे दिसून येत नाही. त्यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची संपूर्ण तयारी केली आहे. शाळांमधील वर्गांचे निर्जंतुकीकरण करणे, एका बाकावर एक विद्यार्थी बसण्याची व्यवस्था, मास्कचे वाटप, हात धुण्याची व्यवस्था अशा कोविडविषयक सुविधांची संपूर्ण तयारी केली आहे. महापालिकेकडून वर्ग सुरू करण्याची संपूर्ण तयारी करण्यात येत असली तरी काही शाळा मुख्याध्यापकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नसल्याचे शिक्षणाधिकार्यांच्या निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेत पालिका शिक्षणाधिकार्यांनी अशा मुख्याध्यापकांसाठी अतिरिक्त सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतचे वर्ग असलेल्या सर्व शाळा १५ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार सर्व दिवस भरवणे बंधनकारक केले आहे. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक असता कामा नये असे कडक सूचना शिक्षणाधिकार्यांकडून सर्व शाळा व्यवस्थापक व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय हा स्थानिक प्रशासनावर सोपवलेला तरी राज्य सरकारकडून शाळा सुरू करण्यासंदर्भातील योग्य निर्देशांची आवश्यकता असते. ओमायक्रॉनचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार सोमवारी निर्णय घेणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा १५ डिसेंबरला सुरळीतपणे सुरू करण्यासंदर्भात मुंबई महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करत शाळा व्यवस्थापकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातील निर्णय झाल्यानंतरच पालिकेच्या क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापलिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.
पालकांचे समंतपीपत्र आवश्यकच
१५ डिसेंबरला पहिली ते सातवीचे वर्ग सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे हे पालकांसाठी ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांला शाळेत पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र घेणे आवश्यक असल्याच्या सूचनाही शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी शाळा व्यवस्थापक व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.