मुंबई :
उपनगरातील मॅटर्निंटी होम, डिस्पेन्सरी या ठिकाणी डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई माहापालिकेने घेतला आहे. त्यानुसार ७५ डायलिसिस मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या नवीन डायलिसिस मशीनमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या डिस्पेन्सरी व प्रसूतिगृहे या डायलिसिस मशीन बसवण्यात येणार आहेत. ओशिवरा गाव, विरा देसाई रोड येथे ८ डायलिसिस मशीन, कांदिवली (प.), येथील डहाणूकर वाडी, डिस्पेन्सरीसाठी १४ डायलिसिस मशीन, विंडमेरेजवळ गोरेगाव येथे ६ डायलिसिस मशीन, अंधेरी – घाटकोपर लिंक रोड, किरोळ गाव, घाटकोपर पूर्व येथे १२ डायलिसिस मशीन, मातोश्री रमाबाई ठाकरे मॅटर्निंटी होम, साईनाथ नगर, घाटकोपर (प.) येथे २२ डायलिसिस मशीन आणि (६), आदर्शनगर, लिंक रोड येथे १३ डायलिसिस मशीन अशा ७५ डायलिसिस मशीनचा पुरवठा लवकरच करण्यात येणार आहे.
डायलिसिसची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना यामुळे महागड्या खासगी रुग्णालयात, नर्सिंग होममध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासणार नाही.