मुंबई
मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ११ शाळांना सीबीएसई बोर्डाने नुकतीच मान्यता दिल्यानंतर आता आयबी बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि आयबी बोर्डाच्या पदाधिकार्यांमध्ये ऑनलाईन सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार आयबी बोर्डाच्या अधिकार्यांनी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आयबी बोर्ड सुरू करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
मुंबई महापालिकेच्या शाळांचा घसरणारा दर्जा रोखण्यासाठी व पालकांना पुन्हा पालिकेच्या शाळांकडे आणण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील सीबीएसई बोर्डाच्या शाळांना पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातच नुकतेच सीबीएसई बोर्डाने पालिकेच्या शाळांमध्ये सुरू केलेल्या ११ शाळांना मान्यता दिली आहे. याता यापुढे जात मुंबई महापालिकेने आयबी बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि आयबी बोर्डाच्या पदाधिकार्यांसोबत चर्चा झाली. यामध्ये आयबी बोर्डाने महापालिकेच्या शाळांमध्ये नर्सरी, प्रायमरी ईयर प्रोग्राम म्हणजे पहिली ते पाचवी, मिडल ईयर प्रोग्राम म्हणजे सहावी ते दहावी, डिप्लोमा प्रोग्राम अकरावी ते बारावी त्याचप्रमाणे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर रिलेटेड प्रोग्राम सुरू करण्यास संमती दर्शवली आहे. या बैठकीनंतर आयबी बोर्डाचे व्यवस्थापक महेश बालकृष्णन यांनी त्यासंदर्भातील पत्र पालिकेला दिले.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे. हा आमचा मानस आहे. त्या अनुषंगाने आम्ही एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, कॅम्ब्रिज व आयबी सारख्या बोर्डांमार्फत मोफत शिक्षण उपलब्ध करून देत आहोत. मुलांच्या सर्वांगी विकासासह या शाळांमध्ये मराठी भाषेची देखील शिकवण दिली जाईल. पालकांनी महानगरपालिकेच्या शाळांची विश्वासाने निवड करावी, हा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.