मुंबई
वांद्रे पूर्वेकडील एमआयजी क्लबलगत असलेल्या समाज मंदिर सभागृहाचा मालमत्ता कर म्हाडाने थकविला आहे. म्हाडाने २०१२ पासून मालमत्ता कर न भरल्याने ही रक्कम १ कोटी ६० लाख ८६ हजार ४७६ रुपयांवर पोचली असून ही रक्कम न भरल्यास सभागृहाचा लिलाव करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणी हे म्हाडाचे मालकीचे समाज मंदिर सभागृह आहे. हे सभागृह खाजगी कार्यक्रमासाठी देण्यात येते. यातून उत्पन्नही मिळत होते. काही वर्षांपूर्वी या सभागृहाचा पुनर्विकास देखील करण्यात आला आहे. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना एका राजकीय व्यक्तीच्या नातेवाईकाने येथे जेवण बनविण्यास विरोध केला. त्यानुसार म्हाडातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने तोंडी सूचना दिल्याने हे सभागृह कार्यक्रमांसाठी देणे बंद केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे सभागृह भाड्याने देऊन त्यामधून येणाऱ्या पैशातून थकबाकी भरण्याचा म्हाडाचा मानस होता. मात्र यामध्येही राजकारण आडवे आल्याने या रक्कमेचा भार म्हाडाला सोसावा लागणार आहे.
म्हाडाने १ सप्टेंबर २०१२ ते 31 मार्च २०२१ या कालावधीतील मालमत्ता कर महापालिकेकडे भरलेला नाही. ही रक्कम तातडीने भरावी अन्यथा या एमएमसी कायदा १८८८ च्या कलम २०६ नुसार या सभागृहाचा जाहीर लिलाव करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने म्हाडाला दिला आहे.
मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटीसबाबत मला कल्पना नाही. या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
– जीवन गलांडे, सह मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा