मुंबई :
कोणत्याही समस्येसाठी नागरिक स्थानिक नगरसेवक, पक्ष कार्यालये किंवा पालिकेच्या वार्डांमध्ये तक्रारी करत असतात. परंतु नगरसेवकांचा कालावधी संपल्याने आता मुंबई महापालिकेवर प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे समस्यांसंदर्भात तक्रारी कोठे करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आयुक्तांनी वॉररूमची व्यवस्था केली आहे.
मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने महापौर, उप महापौर, विविध समित्यांचा कालावधीही संपुष्टात आला. त्यामुळे पालिकेची निवडणूक होऊन नवीन महापौर, समित्यांची स्थापना होईपर्यंत पालिकेचा कारभारावर प्रशासकाचा अंकुश राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांना नालेसफाई, पाणीपुरवठा, रस्ते, कचरा समस्यांबाबत तक्रारी करण्यासाठी पालिकेने वॉररूमची व्यवस्था केली आहे. नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास चॅट बॉट, सोशल मीडिया, विभागनिहाय वॉर्ड वॉर रूम येथे तक्रारी करता येणार आहेत. वॉर्डरूमकडे नोंदवण्यात येणार्या तक्रारींवर संबंधित वॉर्डचे सहाय्यक आयुक्त दिवसातून दोन वेळा आढावा घेऊन तक्रार मार्गी लावणार आहेत.
सोशल मीडियावर करता येईल तक्रार
- फेसबुक – https://www.facebook.com/MyMumbaiMyBMC
- ट्विटर लिंक – https://twitter.com/mybmc
- व्हाट्सअप चॅट बॉट क्रमांक – ८९९९२२८९९९