मुंबई
अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री कोविड बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे या अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मात्र सीमा खान, करीना कपूर, अमृता अरोरा आणि करण जोहर यांच्या इमारती सील करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील चित्रपट निर्माता करण जोहर याच्या पार्टीत अभिनेत्री करीना कपूर व अमृता अरोरा या दोघी सहभागी झाल्या होत्या. मात्र या पार्टीनंतर त्या दोघींची कोविड चाचणी केली असता त्या दोघी कोविड पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या दोन्ही अभिनेत्रींना कोविड बाधा झाल्याने त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी त्यांच्या संपर्कात आलेल्या तसेच त्या राहत असलेल्या इमारतीमधील लोकांच्या कोविड चाचण्या तातडीने करण्यात आल्या. त्याचा अहवाल बुधवारी येणे अपेक्षित आहे. दरम्यान, चित्रपट निर्माता करण जोहर यांचा कोविड अहवाल आला असून त्यांना कोविडची लागण झालेली नाही. मात्र पालिकेने खबरदारी व सुरक्षिततेचे कारण देत जोहर यांची इमारत सील केली आहे. पालिकेने करण जोहरसोबतच अभिनेत्री करिना कपुर, अमृता अरोरा आणि सोहेल खान याची पत्नी सीमा खान राहत असलेल्या चार इमारती सील केल्या आहेत.