मुंबई :
दादर येथील हालारी विसा ओसवाल समाजाच्या हॉलमध्ये झालेल्या ४९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशच्या अब्दुल रेहमानने आंतर राष्ट्रीय खेळाडू रिझर्व्ह बँकेच्या झाहिर पाशाला २५-०, २१-१६ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि आपल्या पहिल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या गटात अपेक्षेप्रमाणे पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रोमोशन बोर्डाच्या अनुभवी काजल कुमारीने प्रथमच अंतिम फेरीत धडक मारणार्या जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेवर १५-१२, १७-१० एकतर्फी अशी मात करून सुवर्ण पदक पटकाविले. पुरुषांमध्ये तिसर्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने रिझर्व्ह बँकेच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेला २५-१९, १८-१ असे नमवून तिसरा क्रमांक पटकाविला. तर दुसरीकडे महिलांमध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या मंताशा इकबालने डिफेन्स अकाउंट्स स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाच्या देबजानी तमूलीला २५-२, २३-९ असे हरवून तिसर्या क्रमांकावर आपले नाव कोरले.
आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर, अखिल भारतीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष रकीबुल हुसेन, सुप्रसिद्ध कॉमेडियन फिल्म स्टार जॉनी लिव्हर, आंतर राष्ट्रीय कॅरम महासंघाचे महासचिव वी. डी. नारायण, राष्ट्रीय कॅरम महासंघाच्या महासचिव भारती नारायण, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे गोपाळ शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला व सचिव यतिन ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. जॉनी लिव्हर यांनी आपल्या धडाकेबाज विनोदी भाषणाने सर्वांची मने जिंकली. याप्रसंगी दोनही हात नसलेला व पायाने कॅरम खेळणारा अपंग कॅरमपटू हर्षद गोठणकर याला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने ५१ हजारांचा धनादेश देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.