Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

दसरा मेळाव्यासाठी विद्यापीठाच्या जागेत शिंदे समर्थकांच्या गाड्या

banner

मुंबई : 

दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापले असताना आता बीकेसीमध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी येणार्‍या वाहनांच्या पार्किंगवरून नवा वाद निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यासाठी राज्यातून तीन ते चार लाख शिवसैनिक येणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. शिंदे समर्थकांच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी मुंबई विद्यापीठाची जागा वापरण्यात येणार आहे. यावरून युवासेनेसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि छात्र भारती संघटनेने आक्रमक भूमिका घेत जोरदार विरोध केला आहे.

दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सध्या जोेरदार शीतयुद्ध सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठीच्या जागेवरून सुरू झालेला हा वाद आता कार्यकर्त्यांच्या येणार्‍या वाहनांच्या पार्किंगवर पोहोचला आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रेतील बीकेसी मैदानावर होत आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून येणार्‍या लाखो कार्यकर्त्यांची वाहने उभी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील जागा नियम धाब्यावर बसवून घेण्यात आली आहे. कलिना कॅम्पसमधील शारीरिक शिक्षण भवनजवळील मैदान, एआयटीए येथील मोकळी जागा, विद्यानगरीच्या उत्तर प्रवेशद्वाराजवळील मोकळी जागा वाहने उभी करण्यासाठी देण्यात आली आहे. या जागेवरी वाहने उभी करण्यासाठी असलेल्या झाडांवर बुलडोझर फिरवण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाची जागेचा वापर हा फक्त शैक्षणिक वापरासाठी होणे अपेक्षित असताना ती जागा राजकीय वापरासाठी देणे अयोग्य आहे. मुंबई विद्यापीठाने राजकीय दबावाला बळी पडून जागा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील वाहनांसाठी दिली असल्याचा आरोप युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला आहे. त्याचप्रमाणे राजकीय सभेसाठी येणार्‍या बसेस विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या जागेमध्ये उभ्या करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. जेणेकरून विद्यापीठ हे राजकीय व्यासपीठ होऊ नये. यापुढे अन्य राजकीय पक्षही विद्यापीठाच्या जागेचा वापर करतील आणि विद्यापीठ हे राजकीय अड्डा बनू शकेल. विद्यापीठाचे प्रभारी रजिस्ट्रार शैलेंद्र देवळाणकर हे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे पीएस होते. त्यामुळे राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होते. शिंदे -फडणवीस सरकारकडून विद्यार्थांच्या हिताचा निर्णय न घेता राजकीय निर्णय लादले जात आहेत. त्यामुळे विद्यापीठाची जागा राजकीय वापरासाठी देण्यात येऊ नये अशी मागणी करणारे पत्र युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत व राजन कोळंबकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्राद्वारे केली आहे. राज्यपालांनी योग्य ती कारवाई करावी. विद्यापीठाचे कोणतेही प्राधिकरण अस्तित्वात नसताना कोणाच्या परवानगीने मैदान दिले याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

युवासेनेबरोबरच राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडूनही मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयाचा जोरदार निषेध केला आहे. मेळाव्यासाठी येणार्‍या वाहनांच्या पार्किंगसाठी कलिना संकुलातील झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यावर तोडलेली झाडे व माती शेकडो डंपरमधून अन्यत्र नेऊन प्रकरण दडपण्याचे काम पालिकेच्या एच/पूर्व विभागाकडून सुरु असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाची जागा ही विद्यार्थ्यांसाठी असून ती राजकीय कार्यक्रमासाठी देणे उचित होणार नाही. तसे केल्यास भविष्यात विद्यापीठाची जागा अशा उथळ कार्यक्रमांना देण्याचा पायंडा पडण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र हरकत घेण्यात आली आहे. ही परवानगी तातडीने रद्द करण्यात यावी, अन्यथा दसर्‍याच्या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात एकही वाहन शिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांनी दिला.

विद्यापीठातील सर्व प्रमुख पदे ही प्रभारी असताना आणि प्राधिकरण अस्तित्वात नसताना जागा राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना कसे काय आपण देऊ शकतो? विद्यापीठ हे पूर्णपणे स्वायत्त आहे पण त्याचा वापर राजकीय कामांसाठी होत असेल तर त्याच्या स्वायत्ततेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. विद्यापीठातील अनेक छोटी-छोटी झाडं, फुलांची मैदान आणि हिरव्यागार गार्डनचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान कोण भरून देणार? असा प्रश्न छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले, सचिन बनसोडे, दीपाल आंब्रे आणि श्रीधर पेडणेकर यांनी उपस्थित करत बेकायदेशी पार्किंग तातडीने रद्द करावी, अशी विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवले आहे.

मुंबई महापालिकेने २८ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई विद्यापीठास पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने, वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानामध्ये होणार्‍या सभेसाठी येणार्‍या वाहनांना पार्किंगसाठी विद्यानगरी परिसरातील जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने विद्यानगरीतील काही जागा अटी व शर्तीच्या अधीन राहून पालिकेला उपलब्ध करून दिली आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

युवासेना व अन्य विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येणार्‍या आरोपांमध्ये तथ्य नाही. विद्यपीठाच्या जागेत कोणत्याही प्रकारच्या झाडांची कत्तल झाली नाही. ही जागा पार्किंसाठी घेताना पूर्ण नियमानुसारच घेण्यात आली आहे. या ठिकाणी पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे केवळ साफसफाईचे काम सुरु आहे. या ठिकाणी किती गाड्या येणार आहेत आणि त्यासाठी कशी व्यवस्था करावी यावर अद्यापही विचार सुरु आहे.
– शीतल म्हात्रे, प्रवक्त्या, शिंदे गट

Related posts

दीपावलीत फटाके फोडताना मुलांची काळजी घ्या : महापालिकेचे आवाहन

सावधान : वाढते वजन ठरतेय कर्करोगाचे कारण 

Voice of Eastern

शिंदे सरकार किती दिवस दिल्लीश्वरांकडून अपमान स्वीकारणार – राष्ट्रवादी काँग्रेस

Leave a Comment