मुंबई :
मुंबईत सोमवारी ४१.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही झाली. २०११मधील उष्णतेचा विक्रम सोमवारी मोडीत काढला आहे. मुंबईतील ही उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट उसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. हे तापमान ४० अंश सेल्सियसच्यावर जाईल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी तापमानात प्रचंड वाढ झाली. मुंबईतील हवामान विभागाच्या माहितीनुसार कुलाबा ४१.६ तर सांताक्रूझ ४१.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे हे या दशकातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. मुंबईत वाढलेला हा उष्णतेचा पारा पुढील दोन ते तीन दिवस असाच चढाच राहणार आहे. १३ आणि १४ मार्चला सौराष्ट्र-कच्छमध्ये उष्णतेची लाट पसरली होती. १६ आणि १७ मार्चला पश्चिम राजस्थान आणि ओडिशामध्ये अशीच स्थिती राहणार आहे.