मुंबई :
उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांची संंख्या ज्या पटीने वाढत आहे, तेवढाच महिलांचा लोकल प्रवास देखील असुरक्षित होत आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना म्हणून लोकल ट्रेनचा महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉक बॅक यंत्रणा बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने काही वर्षांपूर्वीच घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात महिलांच्या डब्यात अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे लागले नाही. परंतु मध्य रेल्वेने आता महिला डब्यांत कॅमेरे बसविण्यासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे.
रात्रीअपरात्री लोकलने प्रवास करणार्या महिलांच्या सुरक्षेसाठी डब्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, टॉक बॅक प्रणाली बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. प्रायोगिक तत्वावर काही डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. मात्र, पुढे ही योजना बारगळली. त्याचप्रमाणे आपत्कालीन प्रसंगी महिला प्रवाशांना लोकलमधील गार्डशी संपर्क साधता यावा यासाठी सर्व महिला डब्यात टॉक बॅक यंत्रणा बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने दोन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र प्रत्यक्षात ही सुविधा एकाही महिला डब्यात बसवण्यात आली नाही. मात्र नवीन वर्षात सीसीटीव्ही लावण्याचे काम रेल्वेकडून हाती घेतली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या लोकलच्या महिला डब्यांत कॅमेरे लावण्यासाठीची निविदा प्रक्रिया जानेवारी २०२२ मध्ये राबवण्यात येणार आहे. यात सुमारे ५३९ कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आहे. तर, सद्यस्थितीत १८० कॅमेरे महिला डब्यात लावले जाणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली.