Voice of Eastern

मुंबई : 

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) कुलसचिवपदी डॉ.विलास दत्तू नांदवडेकर हे १ ऑक्टोबर रोजी रुजू झाले. कुलसचिव पदाचा अतिरिक्त प्रभार असलेल्या डॉ. वंदना शर्मा यांच्याकडून त्यांनी विद्यापीठाच्या चर्चगेट आवारात पदभार स्वीकारला. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एसएनडीटी विद्यापीठ कुलसचिव पदी निवड झाल्याबद्दल डॉ. नांदवडेकर यांचे कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव यांनी अभिनंदन केले आहे. यापूर्वी सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक, संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून ते कार्यरत होते. डॉ. नांदवडेकर हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथील आहेत. त्यांनी पुण्याच्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संचालकपदी काम केले. शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नोव्हेंबर २०१६ मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. नांदवडेकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी पाच वर्षे कामकाज केले. प्रशासकीय कामकाजाचा असलेला त्यांचा व्यापक अनुभव विद्यापीठाच्या विकासाकरिता लाभदायी ठरणारा असेल.

कुलसचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर बोलताना डॉ. विलास नांदवडेकर म्हणाले, शंभर वर्षाहून अधिक मोठी परंपरा, आशिया खंडातील पहिले महिला विद्यापीठ आणि सात राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलसचिवपदी काम करण्याची संधी मिळते हा माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. शिवाजी विद्यापीठ व सिंहगड इन्स्टिट्यूट येथे केलेल्या कामाचा अनुभव मला एसएनडीटी साठी उपयुक्त ठरेल आणि एसएनडीटी विद्यापीठाचा जो लौकिक आहे, त्याला साजेशी कामगिरी करण्यासाठी सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केले जाईल. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनानुसार कामकाज करताना विद्यापीठ हिताच्या वेगवेगळ्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न राहील तसेच विद्यापीठीय कामकाजात जास्तीत जास्त संगणकीय प्रणालीचा (ICT) चा वापर करण्यावर भर देण्यात येईल व कामकाजात गतिमानता आणण्याचा कायम प्रयत्न केला जाईल. त्यांच्या या नियुक्तीमुळे विद्यापीठाला एक चांगला प्रशासकीय अधिकारी मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले व विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांमध्ये समाधान असल्याचे पाहायला मिळाले.

Related posts

दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो..! – मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

कुलगुरूंचा स्थगन आयुधावरच घाव; विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत १ हजार ५८४ पदांची भरती

Leave a Comment