मुंबई :
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सुट्टीच्या नियोजनाचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार हिवाळीची सुट्टी २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली होती. मात्र त्याला जोडून आलेल्या शनिवार व रविवारमुळे विद्यापीठाने नव्याने परिपत्रक काढून हिवाळी सुट्टीच्या वेळापत्रक बदल करून ती १ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
हिवाळी सुट्टीसंदर्भात काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून सुट्टी जाहीर केली होती. त्यामध्ये २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हिवाळी सुट्टीनंतर लगेचच १ जानेवारीला शनिवार व २ जानेवारीला रविवार येत असल्याने प्राध्यापक व कर्मचार्यांना हिवाळी सुट्टीनंतर एक दिवस कामावर रूजू होऊन पुन्हा सुट्टी घ्यावी लागणार आहे. ही बाब प्राध्यापक सेनेकडून विद्यापीठाच्या लक्षात आणून दिली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, प्र. कुलगुरू तसेच कुलसचिव यांना महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे अध्यक्ष डॉ. धनराज कोहचाडे यांनी ई-मेलद्वारा ही बाब निदर्शनास आणून देत नियोजित हिवाळी सुट्टीच्या तारखांचा विचार करावा अशी विनंती केली. त्याप्रमाणे मुंबई विद्यापीठाने हिवाळी सुट्टीची पुनर्आखणी करून २५ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ पर्यंत सुट्टी जाहीर केली. त्यासंदर्भातील परिपत्रक काढून सर्व शैक्षणिक संस्थांना पाठविले आहे.