मुंबई :
चित्रपटांमध्ये होळी, दिवाळी, गणेशोत्सव आणि दहीहंडी यासारख्या सणांवर नेहमीच एखादे तरी गाणे हमखास असते. परंतु महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीवर क्वचित एखादं चित्रपटात गाणे आढळून येते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकत समाजातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘फास’ चित्रपटामध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर एका गाण्याचा समावेश केला आहे. शिवजन्माचं वर्णन करणाऱ्या या गाण्याचा मुखडा ‘शिवनेरीवर शिवशक्तीचं तेज जन्मलं आज…’ असा असून त्याची सुरुवात ‘जी जी रं जी जी…’ असं म्हणत झाली आहे. हे धडाकेबाज गाना नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
माँ एंटरटेनमेंट प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित ‘फास’ची निर्मिती नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड यांनी मिळून केली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर असलेले हे गाणे गीतकार अमोल देशमुख यांनी लिहिले तर , संगीतकार अॅलन के. पी. यांनी अवधूत गुप्ते आणि शेख निशांत यांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत केलं आहे. कमलेश सावंतवर हे गाणं चित्रीत झाले आहे. गाण्याच्या सुरुवातीला खाकी वर्दीत राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता उपेंद्र लिमयेही दिसतो. त्यानंतर गाणं सुरू होतं. ढोल-ताशांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गाणारं हे गाणं चित्रीत आणि ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. ज्युनियर कलाकार आणि ढोल-ताशा पथकांचा या गाण्यामध्ये समावेश केला आहे. शिस्तबद्ध ढोल वादन आणि तालबद्ध नर्तनाबरोबरच अस्सल मराठमोळं लेझीम नृत्य, तलवारबाजी, दांडपट्टा या साहसी खेळांसोबतच महाराष्ट्राची ओळख असलेली फुगडीही पाहायला मिळते.
अविनाश कोलते यांनी ‘फास’चं दिग्दर्शन केलं आहे. यात उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत, पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी केलं आहे, तर दिग्दर्शन करणाऱ्या अविनाश कोलते यांनीच पटकथालेखनही केलं आहे. जगात कौतुकाची थाप मिळवत १३० पेक्षा अधिक पुरस्कार पटकावणारा ‘फास’ ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शेतकरी आणि त्यांच्या जीवनशैलीकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा ठरणार आहे. सातत्यानं वाढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणाऱ्या परिणामावर आधारलेली कथा ‘फास’मध्ये पहायला मिळणार आहे. कानसह जापान आणि पॅरिस या परदेशांसोबतच राजस्थान व नोएडा या महत्त्वाच्या शहरांमधील सिनेमहोत्सवांमध्ये ‘फास’चं खूप कौतुक करण्यात आलं आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून रमणी रंजन दास यांनी तर संकलनाची जबाबदारी अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे तसेच कला दिग्दर्शनाची बाजू संतोष समुद्रे यांनी सांभाळली आहे.