मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी जोरदार निषेध केला. मात्र या आंदोलनापासून युवासेनेचे दोन सदस्य लांबच राहिले, तर एक सदस्य गैरहजर होता. त्यामुळे आंदोलनावरून युवासेनेमध्ये फूट पडल्याचे दिसून आले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. मुंबई विद्यापीठ अर्थसंकल्पीय अधिसभा १५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू झाली. मात्र अधिसभा सुरू होण्यापूर्वी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी उभे राहून राज्यपालांचा निषेध केला. तर युवासेना सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात, शीतल शेठ देवरुखकर, डॉ. धनराज कोहचाडे, महादेव जगताप, शशिकांत झोरे, राजन कोळंबेकर यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी युवासेनेचे दोन सदस्य हे आंदोलनात सहभागी झाले नाहीत, तर एक सदस्य आंदोलनावेळी गैरहजर होता. त्यामुळे राज्यपालांविरोधातील निषेधादरम्यान युवासेनेमध्ये फूट पडल्याची दिसून आली. युवासेनेच्या या आंदोलनाला राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी, धनेश सावंत, वैभव नरवडे, नील हेळेकर यांनी हे शैक्षणिक व्यासपीठ असल्याने हा विरोध येथे नको अशी भूमिका घेत विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणार्यांना पाठीशी घालणे हा महाराष्ट्रद्रोह आहे. त्यामुळे या आंदोलनाला विरोध करणारे सिनेट सदस्य हे महाराष्ट्रद्रोही असल्याची टीका अॅड. वैभव थोरात यांनी केली.
विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, तरी अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी पुन्हा करु नये अशा भावना कुलपती यांना कळवाव्यात, अशा सूचना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी कुलगुरूंना केल्या.