मुंबई :
मुलुंड पश्चिमेकडील झुलेलाल मंदिराजवळील भाजी मार्केटमध्ये असलेले ३०० वर्ष जुन्या वडाच्या झाडावर काही अज्ञात व्यक्तींकडून विषप्रयोग करण्यात आला आहे. त्याविरोधात श्रेष्ठ आई प्रतिष्ठान आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी झाडाला मिठी मारत चिपको आंदोलन करत पालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मुलुंड पश्चिमेकडील भाजी मार्केटमध्ये ३०० वर्ष जुने वडाचे तसेच एक पिंपळाचे झाड आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास या दोन्ही झाडांना शिडी लावून काही अज्ञात व्यक्ती झाडावर चढले. त्यांनी ड्रिलच्या साहाय्याने वडाच्या झाडाला १२ फुटांवर तर पिंपळाच्या झाडाला दोन दोन फुटांवर छिद्र पाडले. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी तेथे पाहणी केल्यावर झाडाजवळ केमिकलची बाटली आढळून आली. तसेच वडाच्या झाडाला खोलवर ड्रिल करून त्यात विषारी केमिकल टाकून त्याला अनैसर्गिकरित्या सुकवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे श्रेष्ठ आई प्रतिष्ठान या सामाजिक संघटना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी हातात व शरीरावर बॅनर घालून चिपको आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी झाडावर चढून झाडाला मिठी मारत चिपको आंदोलन करत मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुलुंड ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल सातपुते यांनी या प्रकरणी पोलीस ठाणे आणि पालिकेकडे तक्रार केली असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे कार्यकारी सदस्य राजेश इंगळे यांनी दिली.