मुंबई :
तीन वर्षांपासून पालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या न्युरो विभागाचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात केईएम रुग्णालयात पक्षघात (पॅरालिसिस/लकवा) या आजारावर अँटोमॅटिक मशीनद्वारे उपचार करून काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो.मात्र या मेसेजची पोलखोल केईएम रुग्णालयाचे न्यूरो विभागाचे प्रमुख डॉ. आदिल छागला यांनी केली आहे. अशा प्रकारची मशीन पालिकेच्या नायर व केईएम रुग्णालयामध्ये असली तरी नागरिकांनी या मेसेजला भुलून गर्दी करु नये, असे आवाहन डॉ. छागला यांनी केले.
मेंदूमध्ये होणार्या गाठी मशीनच्या सहाय्याने अॅन्जिओप्लास्टीप्रमाणे काढून टाकल्या जातात. भारतात केईएम रुग्णालयाध्ये प्रथमच ही सुविधा उपलब्ध केली असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र रुग्णांना मेंदूचा झटका आला की, गोल्डन अवरमध्ये त्यांच्यावर तातडीने उपचार केले असता त्यांचा जीव वाचू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये ज्या अॅटोमॅटिक मशीनचा उल्लेख केला आहे, त्याचे नाव बाय प्लेन डिजिटल सबस्ट्रॅक्शन अॅन्जिओग्राफ्री असे आहे. काही लोक या मशीनला मॅजिक मशीन असे संबोधतात. ही मशीन केइएमबरोबरच सायन आणि नायर रुग्णालयामध्येही आहे, अशी माहिती डॉ. छागला यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी या मेसेजला भुलून गर्दी करु नये, असे आवाहन डॉ. छागला यांनी केले आहे. याबाबत सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार करण्यात येणार असून यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी विनंती ते पोलिसांना करणार आहेत.
ही मशीन येण्यापूर्वी जवळपास सर्वच सर्जन ओपन सर्जरी करत होते. मी स्वतः वास्कुलर सर्जरी करतो. ही रुग्णांना अधिक फायदेशीर असून स्वस्त आहे. यासाठी साधारणपणे २० ते ४० हजार खर्च येतो. मात्र या मशीनने अर्थात इंडोवास्कुलरने अशाच रुग्णाच्या उपचाराचा ५ ते ८ लाख खर्च येतो. म्हणजेच नेहमीच्या शस्त्रक्रियेपेक्षा दुप्पट पटीने या मशीन करण्यात येणार्या शस्त्रक्रियेला खर्च येतो. त्यामुळे ही शस्त्रक्रिया महागडी आहे.
केईएम रुग्णालयाच्या नावाने मेसेज व्हायरल केल्यामुळे गरीब जनतेचा केईएम रुग्णालयावरील विश्वासाला तडा बसू शकतो. त्यामुळे मी स्वतः केईएमच्या अधिष्ठात्यांकडे याबाबत तक्रार केली असून सायबर पोलिसांकडेही हा खोटा मेसेज पसरविणार्यांविरोधात तक्रार करणार आहे, त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या मेसेज वर विश्वास ठेवू नये.
– डॉ. आदिल छागला, न्यूरो सर्जरी विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय