पुणे :
पुण्यातील गिर्यारोहकांनी सह्याद्रीतील ४० विविध सुळक्यांवर प्रस्तरारोहण करत आरोहण करण्याचा संकल्प केला आहे. यातील २५ सुळक्यांवर दोन आठवड्यांमध्ये यशस्वी चढाई करण्यात त्यांना यश आले आहे. यामध्ये रायगड, ठाणे, पालघरमधील २४ सुळके तर नाशिक जवळील डांग्या सुळक्याचा समावेश आहे.
उत्कृष्ट गिर्यारोहक घडवणारी देशातील गिरिप्रेमी या संस्थेला ४० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संस्थेतील गिर्यारोहकांनी सह्याद्रीतील ४० विविध सुळक्यांवर प्रस्तरारोहण करत आरोहण करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यानुसार एव्हरेस्ट शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या नेतृत्वाखालील एका तुकडीने रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सुधागड, पाली, सरसगड, चंदेरी, बदलापूर, पालघर येथील विविध २४ सुळक्यांवर आरोहण केले. यात ५० ते २५० फूट उंच असलेल्या सुळक्यांचा समावेश होता. कृष्णा ढोकले यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेदरम्यान संघ सदस्यांनी अतिशय दुर्गम भागातील सुळक्यांची निवड केली होती. त्यांच्या संघात सचिन शाह, राजेंद्र मोरे व ओंकार बुर्डे यांचा समावेश होता. प्रत्यक्ष चढाईदरम्यान चढाईचा नवीन मार्ग शोधणे. मार्गातील निखळणारे दगड, अंगावर येणारे कडे, निसरडी माती, दोर लावण्यासाठी कमी उपलब्ध जागा, कोरडे व उष्ण हवामान अशा नैसर्गिक आव्हानांचा सामना करत संघाने २४ सुळक्यांवर यशस्वी चढाई केली. यातील २१ सुळक्यांवर मोहीम नेते ढोकले यांनी स्वतः चढाई केली. आतापर्यंत ढोकले यांनी १०० सुळक्यांवर यशस्वी चढाई करण्याचा विक्रम केला आहे.
गिरिप्रेमीच्या दुसऱ्या तुकडीने नाशिक जवळील डांग्या सुळक्यावर यशस्वी चढाई केली. या संघात डॉ. सुमित मांदळे, भूषण शेट, वरूण भागवत व रोहन देसाई यांचा समावेश होता. श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरिप्रेमी संस्थेतील गिर्यारोहक प्रस्तरारोहणाचे आव्हान स्वीकारत आहेत. येत्या काळात ४० सुळक्यांवरील आरोहण पूर्ण करण्याचे ध्येय संस्थेने ठेवले आहे.