Voice of Eastern

मुंबई : 

आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन योजनेवर आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून किमान एका शाळेला भेट देऊन तेथील माध्यान्ह भोजन योजनेची कशाप्रकारे अंमलबजावणी होत आहे, याची तपासणी करायची असल्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशातील सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत.

देशातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत माध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम पोषण) योजना या नावाने ओळखली जाते. पीएम पोषण योजनेसाठी केंद्र सरकारकडून २०२१-२२ ते २०२५-२६ वर्षांसाठी ५४ हजार ६१ कोटींच्या निधीची तरतूद केली आहेत. तर राज्य सरकारांकडून ३१ हजार ७३३ कोटी निधी उपलब्ध केला जाणार आहे. पीएम पोषणा योजना ही तळागाळातील प्रत्येक गावापर्यंत पोहचली जावी व तिची योग्य अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून या योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या योजनेचे निरीक्षण करताना पीएम पोषण योजनेबद्दलची माहिती मिळेल. तसेच त्यांना वास्तविक जीवनातील परिस्थितीद्वारे त्याचे व्यावसायिक अनुभव समृद्ध करण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक कार्यक्षमता वाढीसाठी चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांना किती कॅलरीज मिळाल्या पाहिजेत, त्या कोणत्या धान्यामधून मिळू शकतात, याची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांना विद्यार्थ्यांना पुरवठा केले जाणारे धान्य व त्यातून मिळणारे पोेषण याच्यावर देखरेख ठेवण्याचे काम विद्यार्थ्यांना करायचे आहे. यासंदर्भात देशातील सर्व विद्यापीठे व शिक्षण संस्थांना योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश यूजीसीने दिले आहेत.

तिथी भोजन योजना

पीएम पोषण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवले जात असले तरी एखादा उत्सव किंवा सणावेळी विद्यार्थ्यांना विशेष जेवण मिळावे यासाठी तिथी भोजन योजना राबवण्यात येणार आहे. समाजाच्या सहभागातून ही योजना राबवण्यात येणार आहे. उत्सव व सणांवेळी समाजातील दानशूर व्यक्तींमार्फत विद्यार्थ्यांना विशेष जेवण पुरवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

Related posts

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा पावसाळी नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहणार

जेव्हा प्रत्यक्ष मुख्यमंत्रीच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची विचारपूस करतात

हार्बर मार्गवरील एसी लोकल सेवा शनिवारपासून बंद

Leave a Comment