मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वरिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहता येत नाही. त्या विद्यार्थ्यांवर उपस्थितीची सक्ती करण्यात येऊ नये. तसेच या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गाची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी सर्व संलग्न महाविद्यालयांच्या प्रमुखांना दिल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील महाविद्यालये तब्बल दीड वर्षांनंतर प्रत्यक्ष सुरू झाली. मात्र कोरोनाचे दोन डोस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा नसल्याने त्यांना महाविद्यालयात पोहचणे शक्य होत नाही. तर वसतिगृह अद्याप बंद असल्याने परगावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुंबईत येणे शक्य होत नाही. असे असतानाही अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना उपस्थिती सक्तीची करण्यात येत होती. यासंदर्भात मंगळवारी युवासेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबकर, शितल शेठ-देवरुखकर, डॉ. धनराज कोहचाडे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडे तक्रार करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक न करता त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. याची दखल विद्यापीठाने तातडीने महाविद्यालयांना एक परिपत्रक जारी करत ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहता येत नाही त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी सर्व संलग्न महाविद्यालयाना देत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.