मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याने २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील मार्गदर्शकतत्त्वेही सरकारने जाहीर केली. मात्र वर्ग सुरू करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाला मिळालेला अपुरा वेळ आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नसल्याने बुधवारी महाविद्यालये सुरू झाली मात्र वर्ग रिकामे असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी असलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती महाविद्यालयांमध्ये मात्र दिसून आली नाही.
शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागामध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याला पालक व विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र वर्ग सुरू करण्यासंदर्भातील नियोजन करण्यासंदर्भात फारच कमी वेळ असल्याने अनेक महाविद्यालय प्रशासनाने वर्ग सुरू करण्यास असक्षमता दर्शवली. त्यामुळे मुंबईतील रुईया, एचआर, जयहिंद आणि झेवियर्स यासारखी नामवंत महाविद्यालये बंदच होती. महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील नियोजन करण्यासंदर्भात आम्ही आजच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची बैठक बोलवली होती. त्यानुसार नियोजन आम्ही केले असून, विद्यार्थ्यांना २२ ऑक्टोबरपासून महाविद्यालयांमध्ये बोलवण्यात येणार असल्याचे मुलुंडमधील वझे केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य बी.बी. शर्भा यांनी सांगितले. पुढील काही दिवसांमध्ये महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयांकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबईतील गिरगाव चौपाटीतील भवन्स महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी हजेरी लावली मात्र बाकांवर असलेली धूळ आणि महाविद्यालयाबाहेर सॅनिटायझरची कोणतीही व्यवस्था नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही काळजी घेतली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. काही महाविद्यालयांनी यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेच नियोजन केल्यामुळे प्रत्यक्ष वर्ग न भरवता ऑनलाईनच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी वर्गाला दांडी मारली.
दुसर्या वर्षापासूनचे वर्ग सुरू
१८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येते. मात्र एफवायच्या वर्गात प्रवेश घेणार्या बहुतांश विद्यार्थ्यांचे १८ वर्ष पूर्ण झालेले नसते. त्यामुळे एफवायच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना महाविद्यालयांमध्ये बोलवण्यात आले होते. परिणामी महाविद्यालयांतील दुसर्या वर्षापासूनचे वर्ग सुरू झालेले दिसून आले.
विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविणार- उदय सामंत
राज्याच्या आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, येत्या ७ ते ८ दिवसांत म्हणजेच २५ सप्टेंबरपासून ते २ नोव्हेंबरदरम्यान व्यापक लसीकरण मोहीम राबविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सिडनेहॅम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या मोहिमेतून राज्याच्या प्रत्येक महाविद्यालयात तेथे शिकणार्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकल प्रवासाचा प्रश्न २ ते ३ दिवसांत मार्गी लावणार
महाविद्यालये सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यात काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयासाठी प्रवास करत आहेत, त्यांनी त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र दाखवल्यावर तिकीट द्यावे, अशी मागणी करणारे पत्र आम्ही मुख्य सचिवांना दिले आहे. ही समस्या येत्या दोन-तीन दिवसात मार्गी लागणार आहे असे आश्वासन सामंत यांनी यावेळी दिले