मुंबई :
कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा लेक्चर या संदर्भातील येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठांनी हेल्पलाइन सुरू कराव्यात, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. जेणेकरून या काळात परीक्षेसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्यास विद्यार्थी आणि महाविद्यालये विद्यापीठाशी हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधू शकतील. ही बाब लक्षात घेता मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमधील शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे. ०२२२६५३२०३१, ०२२२६५३२०३२ हे दोन हेल्पलाइन क्रमांक विद्यार्थी आणि महाविद्यालयांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ठेवले आहेत. या क्रमांकांवर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.