मुंबई :
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ७ फेब्रुवारी २०२२ रोजी २१ वा दीक्षान्त समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करत पुढे ढकलण्यात आला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली ७ फेब्रुवारी २०२२ रोजी ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार होणार होता. मात्र लता मंगेशकर यांच्या निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय दुखवटयामुळे दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. या कार्यक्रमाची पुढील तारीख कळविण्यात येईल असे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले. या अनुषंगाने सर्व संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना सूचित करावे, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले. दरम्यान मुंबई विद्यापीठानेही विद्यापीठाशी संलग्नित, संचलित, स्वायत्त सर्व महाविद्यालयांचे प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज बंद ठेवले असून, ७ फेब्रुवारीला विद्यापीठातील नियोजीत सर्व बैठका पुढे ढकलण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी सांगितले.