मुंबई :
नववर्षात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. मागील आठवड्यामध्ये दोन ते तीन हजारांच्या घरातील रुग्ण संख्या रविवारी थेट ११ हजारपर्यंत पोहोचली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्याही थेट ८ हजारांच्या घरात पोचली आहे. कोरोनाबरोबरच ओमायक्रॉननेही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात रविवारी ओमायक्रॉनचे ५० नवे रुग्ण सापडले असून, त्यामध्ये पुण्यमध्ये सर्वाधिक ३६ रुग्ण सापडले आहेत.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रविवारी थेट ११,८७७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,९९,८६८ तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४२,०२४ झाली आहे. राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या मात्र आटोक्यात आहे. रविवारी राज्यामध्ये ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत राज्यामध्ये १,४१,५४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. राज्यात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढती संख्या पाहता तिसर्या लाटेचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे.
राज्यात ओमायक्रॉनचे ५० रुग्ण
राज्यात रविवारी ओमायक्रॉनचे ५० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ५१० वर पोहोचली आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ३६ रुग्ण पुणे मनपामध्ये सापडले आहेत. आतापर्यंत सापडलेल्या ५१० पैकी १९३ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
मुंबईत मृत्यूचे प्रमाण शून्य
मुंबईमध्ये कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यू प्रमाण आठव्यांदा ’शून्य’ नोंदविले आहे. डिसेंबरमध्ये कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ७ वेळा ‘शून्य’ इतके नोंदविण्यात आले आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईमध्ये ६३४७ रुग्ण आढळले असताना दुसर्या दिवशी ८०६३ रुग्ण आढळून आले.
ओमायक्रॉनला सहज घेऊ नका!
ओमायक्रॉन विषाणूला सहज घेऊ नका. तसेच त्यास प्राणघातक समजू नका. ज्यांचे लसीकरण झालेले नाही. ज्यांना गंभीर स्वरूपाचे इतर आजार आहेत, त्यांच्यासाठी हा विषाणु तेवढाच घातक आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. महिन्याभरात कोरोना लागण झालेल्या रूग्णांची संख्या लाखोंच्या घरात जाणार असून मृत्यूचे प्रमाण एक टक्का जरी गृहित धरले तरी काही हजारात मृत्यू ओढावतील. त्यामुळे लसीकरणाला गती द्यावी आणि लोकांचे जीव वाचवावेत, अशा सूचना आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील जिल्हाधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात केल्या आहेत.