मुंबई :
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूची संख्याही कमी होत आहे. त्यातच मार्चमध्ये अवघ्या आठवडाभरात दुसर्यांदा कोरोना रुग्णांचे शून्य मृत्यू झाले आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये सोमवारी २२५ कोरोना रुग्ण आढळून आले असून, १८ एप्रिल २०२० पासूनची सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद सोमवारी झाली. त्यामुळे राज्यातून लवकरच कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात सोमवारी २२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यामुळे सोमवारी नोंद झालेली रुग्णसंख्या ही १७ एप्रिल २०२० पासूनची सर्वात कमी रुग्ण संख्या ठरली आहे. रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरच कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. २ मार्च रोजी राज्यामध्ये कोरोना मृत्यूंची संख्या शून्य नोंदवण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात दुसर्यांदा कोरोना मृत्यूची संख्या शून्य इतकी नोंदवली गेली आहे. ही बाब राज्यासाठी समाधानकारक मानली जात आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७८,६९,०३८ इतकी झाली असून, ३,४७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत १,४३,७४० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. राज्यात सोमवारी ४६१ रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत ७७,१७,८२३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के एवढे झाले आहे.