मुंबई :
मुंबईत ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये शनिवारी कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत शून्य मृत्यूची नोंद होण्याची ही चौथी घटना असून, डिसेंबरमध्ये तीन वेळा शून्य मृत्यूची नोंद झालीआहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. मुंबईमध्ये शनिवारी २७४ रुग्ण सापडले असून, रुग्णांची संख्या ७,६६,७२९ वर पोहोचली आहे. मात्र कोरोना बाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून या महिन्यात मुंबईतील कोरोना मृत्यू तब्बल तीन वेळा शून्यावर आला. मार्च २०२० मध्ये कोविड-१९ सुरू झाल्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या डिसेंबरमध्ये आतापर्यंत तिसर्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. या महिन्यात यापूर्वी ११ डिसेंबर आणि १५ डिसेंबरला आणि आता १८ डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झाली होती.