मुंबई :
डिसेंबर भय इथले संपत नाही अशी अवस्था आज आपली आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांनी कोव्हिड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर लहान मुलांना सुद्धा कोव्हिडचे लसीकरण लवकरच सुरू होईल असे संकेत महाराष्ट्र टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी दिले आहेत. लहान मुलांवर देण्यात येणाऱ्या लसीची चाचणी नायर हॉस्पिटलमध्ये सुरू असून लवकरच सर्व मुलांचे लसीकरण सुरू होईल असा विश्वास ओक यांनी यावेळी व्यक्त केला.
चिंचपोकळी येथील विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने आयोजित केलेल्या ६४ व्या ऑनलाईन विवेकानंद व्याख्यानमालेत कोरोना आणि आरोग्य साक्षरता या विषयावर पत्रकार संतोष आंधळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
टास्क फोर्स नेमके काय काम करते या प्रश्नावर उत्तर देताना डॉ.ओक म्हणाले की, टास्क फोर्स हे सल्लागाराचे काम करीत आहे. टास्क फोर्स कडून लोकांना खूप काही अपेक्षा आहेत या टास्क फोर्स मध्ये सुरुवातीला ९ तज्ज्ञ डॉक्टर होते आता त्याची संख्या ही १४ झाली आहे. जगामध्ये कोरोना विषयी चालू असलेल्या घडामोडींविषयीची अद्ययावत माहिती घेऊन त्याविषयी संबंधित तज्ज्ञ लोकांशी बोलले असे एकंदर काम आहे. लसीकरणाबद्दल बोलताना म्हणाले की लसीकरणासंदर्भात अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे अनेक लोकांनी पहिला डोस सुद्धा घेतलेला नाही तर अशा लोकांनी लवकरात लवकर पहिला डोस घेऊन शासनास सहकार्य करावे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था चांगली नाही असा आरोप नेहमी होतो त्यामुळे आरोग्य व्यवस्था चांगली व्हावी हे माझे स्वप्न असून त्याप्रमाणे चित्र हळूहळू बदलत आहे. तसेच मुंबईत किंवा मुंबईबाहेर एक सुसज्ज असे संसर्गजन्य रुग्णालय पुढील दशकात उभारण्याची गरज आहे असेही डॉ. ओक म्हणाले. दक्षिण आफ्रिकेसह युरोपीय देशांमध्ये आलेल्याओमायक्रॉन कोरोना व्हेरीअंट हा जरी धोकादायक नसला तरी आपण सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचा असल्याचे ओक यांनी सांगितले.
याप्रसंगी मंडळाचे प्रास्ताविक मंडळ प्रमुख निलेश घोडेकर तर मान्यवरांचा परिचय आणि सूत्रसंचालन सहायक व्याख्यानमाला प्रमुख स्वप्निल हराळे यांनी केले बोधपटाचे वाचन साहिल पाटील यांनी तर गीत गणेश पवार यांनी गायले.