मुंबई :
लाऊडस्पिकरसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी दोन मशिदीच्या ट्रस्टीविरुद्ध सांताक्रुज आणि वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मशिदीच्या भोग्यांवरुन असलेल्या वादानंतर मशिदीच्या ट्रस्टीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. या ट्रस्टीमध्ये वांद्रे येथील नूराणी मशिदीसह सांताक्रुज येथील लिंक रोडवरील कब्रस्तान मशिदीच्या पदाधिकार्यांचा समावेश आहे.
मशिदीवरील भोंग्यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या इशार्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मशिदीवरील भोंगे न उतरविल्यास मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मशिदीसमोरच हनुमान चालीसा पठण करतील अशी घोषणा मनसेच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही नियम जारी केले होते. मात्र या नियमांचे वांद्रे येथील नूराणी आणि सांताक्रुज येथील कब्रस्तान मशिदीच्या ट्रस्टीने उल्लघंन केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या दोन्ही मशिदीच्या ट्रस्टीविरुद्ध सांताक्रुज आणि वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही मशिदीमध्ये गुरुवारी सकाळी लाऊडस्पिकर नमाज अदा करण्यात आली होती. सकाळी सहाच्या आधी लाऊडस्पिकर वापरण्यास बंदी असताना त्यांनी लाऊडस्पिकर अजान दिली होती. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी यापूर्वीच काही मशिदीच्या ट्रस्टीना तशी सूचना केली होती. तरीही या नियमांचे या दोन मशिदीच्या ट्रस्टीकडून उल्लघंन करण्त आले होते. इतकेच नव्हे तर दुपारीही लाऊडस्पिकर मोठ्या आवाजात अजान देण्यात आली. त्यामुळे त्याची सांताक्रुजसह वांद्रे पोलिसांनी गंभीर दखल घेत या दोन्ही मशिदीच्या ट्रस्टीच्या विरोधात भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारी हाताळण्यासाठी ९१ अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकार्यांवर ध्वनी प्रदुषण करणार्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर मुंबईतील २६ मशिदीच्या ट्रस्टीनी भोग्यांवरुन अजान देणार नसल्याचा निर्णय जाहीर केला होता.