मुंबई :
दलित पँथरच्या स्थापनेला यंदा ९ जुलै रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समितीची स्थापना करण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आहे.
आंबेडकरी चळवळीतील विचारवंत नेते अर्जुन डांगळे व रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस विचारवंत नेते अविनाश महातेकर, दिलीप जगताप, प्रेम गोहिल, चंद्रकांत हंडोरे यांची नुकतीच एक प्राथमिक बैठक झाली. त्यात दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी राज्यातील आंबेडकरी चळवळीचे सर्व साहित्यिक विचारवंत दलित पँथरशी संबंध राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांना दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीच्या स्थापनेसाठी बैठकीस निमंत्रित करण्यात येणार आहे. दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव निमित्त स्थापन करण्याच्या समितीची बैठक १३ फेब्रुवारी रोजी मुंबईत घेणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
दलित पँथरने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा तरुणांना दिली. अन्यायाविरुद्ध लढण्याचे दलित पँथर उर्जास्रोत राहिला आहे. त्यामुळे दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव समग्र आंबेडकरी चळवळीच्या वतीने साजरा करण्यासाठी सर्वसमावेशक दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन करणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली.