मुंबई :
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पक्षातील व्यक्तीने दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टिळक नगर पोलीस ठाण्यात हंडोरे यांनी स्वतः जाऊन सुपारी देणारा आणि घेणाऱ्याविरोधात तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली आहे, राजकीय पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याची धमकी आणि हत्येची सुपारी दिल्याचे काळे यांनी सांगितले.
चेंबूरच्या पी. एल.लोखंडे मार्ग येथे राहणारे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहे. त्यांनी शुक्रवारी रात्री स्वतःहून टिळक नगर पोलीस ठाण्यात जाऊन निलेश श्याम नानचे आणि सुपारी किलर संदीप चंद्रकांत गोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. चेंबूरमधील घाटला येथे राहणाऱ्या निलेशचे हंडोरेसोबत अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. हंडोरेच्या पक्षातील प्रभावामुळे आगामी पालिका निवडणुकीत निलेशला उमेदवारीचे तिकीट मिळणार नसल्यामुळे त्याने संदीप गोरेला माझ्या हत्येची सुपारी दिली. तसेच मला मारण्याचा कट रचून धमकी दिल्याची तक्रार हंडोरे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
राजकीय वर्तुळातील एक व्यक्तीने त्यांना सुपारीची माहिती दिली. हंडोरे यांनी माहितीची खातरजमा करून शुक्रवारी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात निलेश नानचे आणि संदीप गोरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, आरोपीचा कसून शोध घेत असल्याची माहिती काळे यांनी दिली. हत्येसाठी किती रकमेची सुपारी दिली, याबाबतची माहिती आरोपीना अटक केल्यावर उघडकीस येईल, असेही काळे यांनी सांगितले.