मुंबई :
मराठी चित्रपटांची वाढती ख्याती पाहता, हिंदीसोबत दक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनाही मराठीत काम करण्याचे वेध लागले आहेत. टेलिव्हीजन विश्वातील सर्वात मोठा क्राईम शो ठरलेल्या ‘सीआयडी’ या मालिकेतील दया म्हणजेच अभिनेता दयानंद शेट्टीही आता मराठीत पदार्पण करतोय. ‘गरम किटली’ या चित्रपटात दया एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
गणेश रॅाक एन्टरटेन्मेंटच्या बॅनर निर्मित ‘गरम किटली’ चित्रपटाचे चित्रसेन नाहक आणि राजेश हे सहनिर्माते आहेत. कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन राज पैठणकर करत आहेत. ‘सीआयडी’ मालिकेतील ‘दया दरवाजा तोड दो…’ हा डायलॉग सर्वांनाच तोंडपाठ झाला आहे. आता मराठी चित्रपटामध्ये दयाचा जलवा पहायला मिळणार आहे. दयानं आजवर जाहिराती व थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. तुळू भाषेतील ‘सिक्रेट’ नाटकातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. १९९८ मध्ये ‘सीआयडी’ मालिकेत सीआयडी आॅफिसरची भूमिकेने त्याच्या करियरला कलाटणी दिली. ‘गरम किटली’मध्ये दया च्या भूमिकेबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. कदाचित त्याच्या वरूनच चित्रपटा चा पडदा उठेल असे सांगण्यात येत आहे.