ठाणे :
ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित मर्यादित ४५ षटकांच्या डीएससीए चषक लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत कौस्तुभ पवार क्रिकेट अकॅडमीने साळगावकर स्पोर्ट्स क्लबचा २१ धावांनी पराभव करत स्पर्धेत पहिला विजय साकारला. भिवंडीतील सोनाळे मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या संकेश मोरयेने आपल्या अष्टपैलू खेळाने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
प्रथम फलंदाजी करताना कौस्तुभ पवार क्रिकेट अकॅडमीने ४३ षटकात २१५ धावांचे आव्हान उभे केले. शुभम देशमुखने ८७ धावांचे योगदान देत संघाच्या द्विशतकी धावसंख्येत सिंहाचा वाटा उचलला. संकेशने नाबाद ३७ धावांची उपयुक्त खेळी केली. प्रदीप पाटीलने २० धावा केल्या. क्षितिज रंजनने ९ धावांत २ आणि प्रशांत मोरेने ३४ धावांत २ विकेट्स मिळवल्या. उत्तरादाखल संकेश आणि शुभम गिरीने प्रभावी मारा करत साळगावकर स्पोर्ट्स क्लबला १९४ धावांवर रोखले. संकेशने ६ षटकात २९ धावांच्या मोबदल्यात तिन फलंदाज बाद केले. वेदांत मिश्राने ७४ धावांची खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली होती. निल सावलाने ४१ आणि अमित पाटीलने २५ धावांची खेळी केली. शुभम गिरीने ३३ धावांत २ विकेट्स मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक :
कौस्तुभ पवार क्रिकेट अकॅडमी : ४३ षटकात सर्वबाद २१५ ( शुभम देशमुख ८७, संकेश मोरये नाबाद ३०, प्रदीप पाटील २०, क्षितिज रंजन ५ – १- ९- २, प्रशांत मोरे ७- ०- ३४-२) विजयी विरुद्ध
साळगावकर स्पोर्ट्स क्लब : ४१ षटकात सर्वबाद १९४ ( वेदांत मिश्रा ७४, निल सावला ४१, अमित पाटील २५, शुभम गिरी ८-१-३३-२, संकेश मोरये ६-०-२९-३)