अलिबाग :
मुरूडच्या समुद्र किनारी शुक्रवारी सकाळी एक मृत महाकाय कासव आढळून आले. हे कासव दुर्मिळ लॉगहेड प्रजातीतील असून त्याची लांबी सुमारे ३.५ फुट तर वजन ४५ किलो इतका आहे. कासव ८ दिवसांपूर्वी मृत झाले असावे, असे सर्पमित्र संदीप घरत यांनी सांगितले. हे कासव कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुरुडच्या समुद्र किनारी घोडागाडी चालक विनोद अंबुकर आपली गाडी घेऊन आले असताना त्यांना समुद्रकिनारी कासव वाहून आलेले दिसले. भले मोठे असलेल्या आणि दुर्गंधी येत असल्याने त्यांनी सर्प मित्र संदीप घरत यांना याची माहिती दिली. संदीप घरत यांनी तातडीने वनखात्याला बोलावून कासवाला समुद्र किनारी पुरून टाकले.
१० एप्रिल रोजी याच ठिकाणी ३० ते ३५ किलो वजनाचे याच जातीचे कासव मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर २ मे रोजी खोरा बंदरात लॉगहेड जातील मादी कासव जिवंत स्वरुपात आढळून आले आहे.