मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये निर्माण होणार्या अँटीबॉडीजचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडून सातत्याने सेरो सर्व्हे करण्यात येत आहे. आतापर्यंत पाच सेरो सर्व्हे झाले असून, सहावा सेरो सर्व्हे डिसेंबर-जानेवारीमध्ये घेण्यात येणार आहे. मात्र या सर्व्हेनंतर मुंबईतील नागरिकांना बूस्टर डोस किंवा तिसरा डोस देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
आतापर्यंत ९९ टक्के मुंबईकरांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ७० टक्के मुंबईकरांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. वर्षभरात पहिला डोस, दुसरा डोस व डोस न घेतलेल्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाली का याचा अभ्यास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आतापर्यंत पाच सेरो सर्व्हेक्षणात नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्रा आता लसीकरणानंतर मुंबईकरांमध्ये अँटिबॉडीज निर्माण झाली आहे का हे तपासण्यासाठी डिसेंबर-जानेवारीदरम्यान सेरो सर्व्हे करण्यात येणार आहे. पालिकेच्या २४ वॉर्डातून डोस घेतलेल्या व डोस न घेतलेल्यांचे रक्ताचे नमुने संकलीत करण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणातून लस किती उपयुक्त ठरली हे स्पष्ट होणार आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये किती टक्के अँटीबॉडीज निर्माण झाल्यात, याचा अभ्यास करण्यात येईल. या अभ्यासानंतर बुस्टर डोस देणे किंवा तिसरा डोस देणे याबाबत विचार करण्यात येईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.