मुंबई :
संपूर्ण भारतातील दत्त भक्तांचे श्रद्धास्थान असलेले गुजरातमधील जुनागढ येथील गिरनार शिखरावर असलेल्या दत्त मंदिरावर काही दुष्प्रवृत्तीच्या व्यक्तींनी श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची व त्यांच्या पादुकांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याने श्रीपादवल्लभ सेवा संस्थेकडून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. तसेच या हल्लाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्याची मागणी संस्थेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
गिरनार शिखरावर असलेल्या दत्त मंदिरावर काही दुष्प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे सर्व दत्त भक्तांच्या काळजाचा ठोका चुकल्यासारखी परिस्थिती झाली आहे. या भ्याड हल्ल्याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड संहितेला अनुसरून कडक कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री यांच्याशी समन्वय साधून कारवाई करावी, अशी विनंती श्रीपादवल्लभ सेवा संस्थेचे सौरभ भोळे यांनी निवेदनाद्वारे सर्व भक्तांच्या वतीने केली आहे. आमच्या मागणीची तातडीने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करून आम्हा सगळ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सर्व श्री दत्त महाराजांच्या भक्तांना न्याय दयावा, अशी विनंती भोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.