मुंबई :
राज्यामध्ये ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रिक टनपर्यंत पोहोचल्यास लॉकडाऊन लावले जाण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे. सध्या राज्यामध्ये ४५० मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनची मागणी पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासमोर चिंतेत वाढ झाली आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात १० जानेवारीपासून निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येबरोबरच ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होत आहे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारीला मेडिकल ऑक्सिजनची मागणी ४३० मेट्रिक टन होती. ज्यामध्ये १११ मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरण्यात आले. याच दिवशी ७५० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन करण्यात आले होते. ५ जानेवारीनंतर राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली. त्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीतहीवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या व ऑक्सिजनची मागणी यावर राज्य आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. सध्या कठोर निर्बंध लावले असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजनची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या राज्य आरोग्य विभागाकडे ११ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनाचा साठा आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व नागरिकांनी राज्य सरकारच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
– अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर असोसिएशन